देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतलाय. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपापलं योगदान देण्याचं आवाहनही केलं.
‘मी एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिलाच डोस घेतला. कोविड १९ विरुद्ध जागतिक लढाईला मजबूत करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी केलेलं गतीशील कार्य उल्लेखनीय आहे’ असं ट्विट पंतप्रधानांनी केलंय.’मी त्या सर्व नागरिकांना लस घेण्याचं आवाहन करतोय जे यासाठी पात्र आहेत. एकत्र मिळून आपण भारताला कोविड १९ मुक्त बनवू’ असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.
आजपासून करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होतेय. या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय.
सरकारकडून या टप्प्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आलीय. या टप्प्यात सरकारी रुग्णालयासोबत खासगी रुग्णालयातही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. खासगी रुग्णालयात करोना लसीच्या एका डोससाठी केंद्रानं २५० रुपयांची किंमत निश्चित केलीय. सरकारी रुग्णालयांत करोना लस अगोदरप्रमाणेच मोफत मिळू शकेल.